वंचित बहुजन आघाडीमध्ये दयानंद पिसाळ यांचा जाहीर पक्ष प्रवेश
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
देशात तसेच महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीमध्ये गोरगरीब व वंचित घटकातील कष्टकरी लोकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चाललेली आहे.
या परिस्थितीमध्ये गोरगरीब, कष्टकरी, वंचित व पीडित जनतेस न्याय मिळवून देण्याचे काम सध्या वंचित बहुजन आघाडी हा पक्ष करीत आहे. पक्षाची ध्येयधोरणे व विचार पाहून आज वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष राज यशवंत कुमार, जिल्हा महासचिव सतीश साळवे, संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, सचिव गोविंद कांबळे, संघटक सुजय रणदिवे, बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष मनोज साबळे व कायदेशीर सल्लागार ॲड. संतोष कांबळे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दयानंद पिसाळ यांनी पक्ष प्रवेश केला.
दयानंद पिसाळ हे राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत अनेक योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिलेला आहे. अन्यायग्रस्त, गोरगरीब, कष्टकरी लोकांना अनेक माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळवून दिलेली आहे, त्यातच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या पाठीशी पूर्णपणे ठाम उभा राहतो व न्याय मिळवून देतो हे त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून अनुभवले आहे. पिसाळ यांचा तळागाळातील जनतेपर्यंत दांडगा जनसंपर्क आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ध्येयधोरणे व विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचे काम जोमाने करू असे पक्षप्रवेशा दरम्यान दयानंद पिसाळ यांनी सांगितले.
ज्ञानदेव लष्कर, जगन्नाथ पिसाळ, गणपत माने, रामभाऊ चौगुले, विजय पिसाळ, सामाजिक कार्यकर्ते शेखर मासाळ व इतर मान्यवर, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.