महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रावर नोकरीच्या अनेक संधी
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आता कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना चांगलीच रुजली आहे. एकूण 1000 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्र मध्ये सुरू आहेत परंतु आता केंद्रांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असून ग्रामीण भागातील युवकांना नोकरीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. कृषी पर्यटनातील रोजगाराच्या संधी ओळखून पळशी येथील कृषी व ग्रामीण पर्यटन विकास केंद्रावर युवकांना कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हे प्रशिक्षण दि. 26, 27 व 28 जानेवारी 2024 दरम्यान होणार असून यामध्ये कृषी पर्यटन केंद्राचे व्यवस्थापन, मार्केटिंग, शिवारफेरी, शासनाच्या विविध विकासाच्या योजना याबद्दल सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृषी पर्यटन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, कारण शहरी पर्यटकांना खेडेगावात जाऊन शेतीशिवार, गावाकडील आदरातिथ्य आवडत आहे. मागील 10 वर्षात 500 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत, मनुष्यबळ कमी पडत आहे.
महाराष्ट्र कृषी पर्यटन विकास समितीचे प्रमुख पांडुरंग तावरे यांनी सांगितले की, बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर या तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणूनच ३ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून युवकांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती पांडुरंग तावरे यांनी यावेळी दिली.
संपर्कासाठी-जानकी गाढवे, कृषी पर्यटन विकास संस्था पळशीवाडी 9226432980 व 9822082130 या नंबर वर संपर्क साधावा.