बारामती लोकसभेच्या रिंगणात सामाजिक कार्यातून स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या कल्याणी वाघमोडे सक्रीय
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन असणाऱ्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावच्या इंजिनीयर, पदवीप्राप्त अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सक्रिय झाल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात सतत कार्यरत असणाऱ्या, लोकांच्या जनसंपर्कात असणाऱ्या लेखिका व परखड महिला नेतृत्व, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वंचित घटक, कष्टकरी लोकांसाठी आयुष्य समर्पित करून गेली 20 वर्ष संघटनेच्या व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय हक्कासाठी वाचा फोडणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा संघर्ष मोठा आहे.
राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत आहेत. पुढील पिढीला हे विचार जपता यावेत म्हणून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या परखड शैलीतून, भाषणातून आपले मत मांडत असतात. स्व.बी.के.कोकरे व स्व.गणपतराव देशमुख यांना देखिल त्या प्रेरणास्थानी मानतात. तसेच त्यांचा सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या कार्यामुळे चांगला संपर्क आहे. 2019 मध्ये मराठवाडा विभागात शिवसेना पक्षातून स्टार प्रचारक म्हणून त्यांनी संघटनेचा पाठींबा देत कार्य केले. अनेक नेत्यांच्या प्रचारात त्यांनी सहभाग घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे धनगर ओबीसी महिला चेहरा म्हणून त्यांना विचारणा झाली होती परंतु आरोग्याच्या समस्यामुळे त्या मैदानात उतरल्या नाहीत. त्यांचे आजोळ (जन्मगाव) पंढरपूर असून प्रसिद्ध कीर्तनकार स्व. ह.भ.प. नामदेव महाराज टेंभुकर यांच्या त्या नात आहेत. बारामती तालुक्यांतील निरावागज त्यांचे माहेर आहे. लहानपण व शालेय जीवन सर्व वडील नोकरीस असल्याने भवानीनगर येथील छत्रपती मुलींचे हायस्कूल याठिकाणी झाले. त्यानंतर बारामती, पुणे, मुंबई, दिल्ली याठिकाणी त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्या विमानाच्या इंजिनियर असून एक उद्योजिका म्हणून काम करतात.
शालेय जीवनापासून नेहमी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धां यामधून आपले विचार मांडत असत. आजही महाराष्ट्रात युवती महिलांमध्ये त्या स्त्री-काल, आज आणि उद्या या विषयावर जागृती करत असतात. अनेक जयंती, सोहळयामधून परखड महिला वक्त्या म्हणून पुढे आल्या. त्या स्वतः महिला नियोजित मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात. खो-खो मधील त्या उत्तम खेळाडू होत्या तसेच कराटे, संरक्षणाचे धडे यातून धाडसी प्रवृत्तीच्या बनल्या. संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर, पुणे, बारामती, पंढरपूर, मुंबई अश्या अनेक ठिकाणी आंदोलने आयोजित करुन समाजाच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या एक परखड महिला नेतृत्व आहेत. धनगर मेंढपाळ प्रश्न, ओबीसी जातनिहाय जनगणना, ओबीसी शिष्यवृत्ती, धनगर आरक्षण, महिला सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांसाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. नुकतेच मुंबई व दिल्ली याठिकाणी धनगर समाजाला आश्वासने देणाऱ्या व मतांसाठी वापर करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा जाहीर असा निषेध करत आंदोलने गाजवली.
महिला विषयावर जागृती, सुरक्षा, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, व्यसनमुक्ती, महागाई तसेच मेंढपाळ यांचे आरोग्य, रस्ते, शिक्षण यासाठी व आरक्षण आंदोलनातून शासन स्तरावर पाठपुरावा करत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे संवाद दौरे, बैठका सतत चालू असतात. आजचे धगधगते प्रश्न जसे शेतकऱ्यांचे प्रश्न (हमीभाव, पाणीप्रश्न, चाराप्रश्न , बी बियाणे, आत्महत्या), महिलांचे प्रश्न, युवकांचे बेरोजगारी, अमली पदार्थ सेवन, कामगारप्रश्न, शैक्षणिकप्रश्न आदींवर गाव भेट दौरे चालू आहेत.
अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये अहिल्यारत्न, समाजरत्न, महिलारत्न, सुपरवुमन तसेच आदर्श पत्रकारिता अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुरुषांबरोबर महिलांनीही आपल्या बुद्धीचा, क्षमतेचा योग्य वापर करत देशहितासाठी विकासाच्या मुद्द्यासाठी पुढे आले पाहिजे हा त्यांचा मानस आहे. ९०% समाजकार्य व १० टक्के राजकारण करीत तळागाळातील वंचित बहुजन, दुर्बल घटकाला न्याय मिळवून देत विकासाच्या प्रवाहात आणणे हेच त्यांच्या जीवनातील अंतिम ध्येय आहे अशी माहिती वाघमोडे यांनी यावेळी दिली.