लोणी भापकर येथे स्वच्छता अभियान फाऊंडेशनच्या वतीने गुणवंतांचा गौरव
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता.बारामती) येथील स्वच्छता अभियान फाउंडेशनच्या वतीने दि. 25 जुन रोजी श्री काळभैरवनाथ मंदीर येथे लोणी भापकर पंचक्रोशीतील स्पर्धापरीक्षा, पोलीसभरती, इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
गुणवंत विद्यार्थी, स्पर्धापरीक्षा, पोलीसभरती झालेल्या युवक युवतींची गावातुन घोड्यावरून मिरवणूक काढुन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी यांचे पालक व शिक्षक वर्ग यांचाही गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ यांना गुलाबपुष्प देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.
स्वच्छता अभियान ग्रुप यांना मदत करणारे दानशूर व्यक्ती संजय पारडे, चारूदत्त बारवकर, माऊली भापकर, संजय गोलांडे, हर्षल प्रभुणे तसेच सेवानिवृत्त अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये लोणीभापकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर, विलास भापकर, सुभेदार माणिक भापकर व लोणी भापकर ग्रामस्थ यांचेवतीने देखील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रुपच्या कामाचा आढावा अभिजीत भापकर, स्वच्छता अभियान फाऊंडेशनची पुढील ध्येय व उद्दिष्ट सचिन पवार यांनी सांगितली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश भापकर, सुत्रसंचालन अविनाश गायकवाड तर आभारप्रदर्शन हरीश्चंद दिक्षित यांनी मानले.
यावेळी लोणी भापकर पंचक्रोशीतील मान्यवर, पदाधिकारी, स्वच्छता अभियान फाऊंडेशनचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.