पळशीत गुढीपाडवा व यात्रा बैठक उत्साहात संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे सर्व ग्रामस्थ एकत्र येत पाडवा वाचन करण्यात आले. यंदाचे पाडवा वाचन माजी सरपंच बाबासाहेब चोरमले यांनी केले.
त्यानंतर दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त असलेल्या यात्रोत्सवासाठी बैठक होऊन मागील वर्षीचा हिशोब व चालू वर्षासाठी यात्रा कमेटी ठरविणे, अखंड हरिनाम सप्ताह कमेटी, हनुमान जयंती, दंडवत, देवाचा छबीना, यात्रेनिमित्त गावात कोणता तमाशा आणायचा याचेही नियोजन यात्रा कमिटीकडून याच बैठकीत केले जाते. यासाठी गावातील इच्छुक व्यक्तींची निवड करून हनुमान जयंतीनिमित्त वर्गणी व व्यवस्थापन, यात्रेतील तमाशा, कुस्त्या यांचे नारळ फोडणे याकरीता यातीलच व्यक्तींच्या चिठ्ठीद्वारे लहान मुलांच्या हस्ते निवड करण्यात येते. अशा पद्धतीने १९५२ सालापासून ही प्रचलित पद्धत याठिकाणी सुरू आहे.
कोणताही गडबड गोंधळ न होता खेळीमेळीच्या वातावरणात गुढीपाडव्याची बैठक पार पडल्याची माहिती यावेळी यात्रा कमिटीकडून देण्यात आली.