यात्रा जत्रा काळात गावोगावी दारू बंदी हवी…
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सध्या अनेक गावांच्या यात्रा जत्रा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. अनेक ठिकाणी यात्रा जत्रा, सप्ताह, बैलगाडा शर्यती, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
यात्रे जत्रेत गावोगावी नातेवाईक, पाहुणेरावळे यांना सहजरित्या दारू मिळत आहे. यामुळे धार्मिक कार्यक्रम असो अथवा मनोरंजनाचा कार्यक्रम, कुस्त्या अशा अनेक कार्यक्रमात दारू पिणाऱ्यामुळे वादविवाद होतात व ते वाढतात. काहींचे विनाकारणच वाद वाढून पोलीस स्टेशनपर्यंत जायची वेळ या लोकांवर येते तरीही दारू धंदेवाले मात्र त्यांचा दारू धंदा सुरूच ठेवतात, काहींचे दारूपायी अपघात होतात, अनेकजण मृत्युमुखी पडल्याची उदाहरणेही या परिसरात घडली आहेत.
यात्रे जत्रेवेळी दारूधंदे चालू असतील तर कुस्त्या, तमाशा कार्यक्रमात गावातील दारू पिणाऱ्यांचाच तमाशा पाहुणेरावळे, गावकरी यांना पहावा लागतो व संपूर्ण कार्यक्रमाचा घाणा होतो.
त्यामुळे यात्रा काळात भांडण तंटा होऊ नये, गावात शांतता राहावी, सामाजिक सलोखा राखावा, शांततेत यात्रा-जत्रा व्हाव्यात यासाठी तरी अनेक गावात सुरु असणारे अवैध दारूधंदे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधिकारी, बीट अंमलदार, पोलिसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी यात्राकाळात तरी दारूधंदे बंद असावेत अशी चर्चा सुरू आहे परंतु समोर कोणी जायचे हाही एक सर्वांसमोर पडलेला प्रश्न आहे. प्रत्येक गावात दोन गट असतात त्यातील एक गट या लोकांना जवळ करतो तर दुसरा गट विरोधी गट ठरतो. त्यामुळे गावातील दारू विक्रेत्यांचेही फावते.
ज्या गावातील यात्रा जत्रा आहेत अशा यात्रा कमिटींना, गावकऱ्यांना पोलीस स्टेशन कडून यात्रेची परवानगी (परमिशन) घेताना गावात जर दारूबंदी असेल तरच यात्रेला परवानगी मिळेल अशा पद्धतीच्या सूचना कराव्यात व जोपर्यंत यात्रा पार पडत नाही तोपर्यंत गावातील दारू बंदच करण्यात यावी अशीही मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.