मोढव्याचा रिल्सस्टार सूरज चव्हाण पोहोचला बिग बॉसच्या घरात
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोढवे या ठिकाणचा रहिवासी असलेला टिकटॉक व रिल्स स्टार सुरज दत्तू चव्हाण (वय २२) हा आपल्या कॉमेडी व्हिडिओच्या जोरावर कलर्स मराठीवरील सुरू असलेल्या बिग बॉस मराठी (सिझन ५) या कार्यक्रमात पोहोचला आहे.
सुरज हा गरीब कुटुंबातील सातवी पास असलेला हरहुन्नरी कलाकार आज टीव्हीवर पोहोचल्याचा आनंद त्याच्या घरातील, गावातील व परिसरातील लोकांना होत आहे. सुरजचे वडील शेळ्या पाळत होते व त्यांचा सांभाळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते तेही काही वर्षांपूर्वी कॅन्सरने वारले. त्यानंतर त्याची आईही वारल्या.
सुरजच्या शेजारी त्याची आत्या कल्पना जाधव व बहीण सीता खोमणे व इतर कुटुंबिय राहतात व तेच त्याला सांभाळतात. सुरजचे भाचे धीरज चव्हाण व ओंकार जावळे यांनी सूरजला व्हिडिओ बनवण्यास शिकविले आणि त्यासाठी मदतही केली.
सुरजच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याला काही वर्षांपूर्वी घरकुल मिळाले आहे. सुरजला आई-वडील नसून तो आत्या व बहिण यांच्या घरी राहतो. त्याचा संभाळ त्याच्या आत्याने केला. सुरजने पाळलेली जिमी नावाची कुत्री देखील त्याच्या घरी आहे. तो तिचे खूप लाड करतो असे त्याच्या घरच्यांनी सांगितले.
सुरजला त्याच्यापेक्षा मोठ्या पाच बहिणी आहेत त्यांची लग्नं झाली आहेत. सुरज हा रोजंदारी, कोंबडखत भरणे, मजुरी करून उदरनिर्वाह करणे अशा पद्धतीची कामे करतो. त्यातून त्याला ३०० ते ४०० रुपये हजेरी मिळते.
सुरज चव्हाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत होते त्यावेळेस त्याला दुकानांचे ओपनिंग, वाढदिवस व इतर कार्यक्रमासाठी बोलवले जात होते त्यावेळी त्यातून त्याला थोडेफार पैसे मिळत असत व अजूनही काही कार्यक्रमासाठी त्याला बोलावले जाते. सुरजची मोढवे येथील मरीमाता देवीवर श्रद्धा आहे. तो साधा भोळा व जास्त हुशार नसल्याने त्याचा अनेकजण व्हिडिओसाठी, प्रसिद्धीसाठी वापर करतात.
सुरजची मोबाईल घेईल एवढीही परिस्थिती सुरुवातीला नसल्याने तो सुरुवातीला इतरांच्या मोबाईलवर व्हिडिओ करायचा, त्यानंतर त्याने भाच्याला घेऊन व्हिडिओ काढायला सुरुवात केली, काही कॉमेडी व्हिडिओ तसेच नाचतानाचे व्हिडिओ त्याने बनवले. व तो काही व्हिडिओंनी रातोरात टिकटॉक स्टार बनला. त्याचे फोलोअर्स, व्ह्यूज लाखो तसेच मिलियनमध्ये गेले. आताही बिग बॉस मध्ये सुरजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एसक्युआरक्यूझेडक्यू , ललालीलालालाला, गुलीगत, बुक्कीत टेंगूल असे अनेक डायलॉग त्याचे गाजले आहेत. या त्याच्या बोबड्या बोलाने तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने अनेक वेबसिरीजमध्ये काम केले. स्वतःचे दुःख, परिस्थिती मनात ठेवून तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो.
भारतातील टिकटॉक बंद झाल्यानंतर त्याला खूप दुःख झाले होते कारण टिकटॉकने त्याला खूपच प्रसिद्धी दिली. त्यानंतर युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम यावर देखील त्याने अनेक व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवली.
सुरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात चांगल्या पद्धतीने खेळ खेळत आहे. काही टास्क त्याला समजले नसले तरी तो इतरांच्यात मिळून मिसळून गेला आहे. तिथेही तो गुलीगत धमाल उडवत आहे. तो हा खेळ जिंकूनच येईल अशी इच्छा त्यांच्या घरच्यांनी व्यक्त केली आहे.
सुरजने त्यानंतर कारे देवा, मुसंडी अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुरजला बिग बॉसच्या घरात बघून काहींनी ट्रोल केले तर अनेकांना आनंद झाला. मुर्टी – मोढवे, मोराळवाडी, जोगवडी, पळशीसह महाराष्ट्रातून त्याचे विशेष कौतुक होत आहे.