दूधाचे दर वाढल्याने गाईंच्या दरातही लक्षणीय वाढ, गाईंचे दर पोहचले लाखांच्यावर
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात जास्तीत जास्त दुध देणाऱ्या गायींची संख्या वाढत चालली असून दूधदर वाढल्याने पशुपालकांना चांगले सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. दुधासाठी कॉलिटीच्या गाई बेंगलोर, पंजाब, हरियाणा येथून खरेदी करण्यापेक्षा होल्सटीन (एचएफ) जातीच्या गाई बारामती तालुक्यातील अनेक ठिकाणी खरेदी विक्री होताना दिसत आहेत.
पळशी (ता. बारामती) येथील प्रसिद्ध व्यापारी काकासाहेब केसकर यांनी पिवर होल्सटीन क्रॉस जातीची पहिलारू कालवड नुकतीच एक लाख 41 हजार रुपये किमतीला विकल्याचे त्यांनी सांगितले. या कालवडाची चर्चा मात्र परिसरात चांगलीच होत आहे.
याप्रसंगी मुर्टी येथील विकास खोमणे, सुनील जाधव, प्रवीण खोमणे, प्रदीप खोमणे, पोपट भंडलकर आदी पशुपालक शेतकरी उपस्थित होते.
गाईंची खरेदी विक्री करणाऱ्याना चांगले दिवस आले असून दूधाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात नोकरी न लागलेले अनेक तरुण गाईगोट्याकडे वळू लागले आहेत. अनेकांनी मका, कडवळ, वेगवेगळ्या प्रकारचे गास लावण्यावर भर दिला असून त्याचेही चांगले पैसे होत आहेत. बंदिस्त गाय गोठा पालनाकडे शेतकरी जोडधंदा म्हणून भर देऊ लागले आहेत. दुधाला चांगली कॉलिटी दिली असता दुधाचे दरही चांगलेच मिळत आहेत अशी माहिती केसकर यांनी यावेळी दिली.
काही मोठे दूध व्यवसायिक तसेच डेअरी व्यावसायिक दुधात भेसळ करत असल्याचेही चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.