डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारस बारामतीची भिमकन्या निकिता खरात झाली पोलीस उपनिरीक्षक


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
(मुनिर तांबोळी) माझे मित्र खुशबू फर्निचर मॉल, फलटण रोड (बारामती) चे मालक जावेद मजलापुरे यांचा फोन आला…की उद्या माझ्या मॉलमध्ये माझ्या मॉल शेजारी राहणाऱ्या एका अत्यंत गरीब कुटुंबातील होतकरू मुलीची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे.‌‌
मी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर मी आवर्जून माहिती घेतली की निकिता खरात ही अत्यंत कष्टकरी मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या आणि एक गुंठाही शेतजमीन नसणाऱ्या व दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची मुलगी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाक्याची परंतु निकिता खरात यांच्या वडिलांचे स्वप्न होते की माझी मुलगी खूप शिकावी शिकून तिने अधिकारी व्हावे, हे स्वप्न घेऊनच ते निकिताचे वडील तिच्या पाठीशी उभे राहिले…
त्यांनी निकिताला स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तक उपलब्ध करून दिली. निकिता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती सकाळी अभ्यासिकेत जायची ती संध्याकाळी परत यायची याच काळात समाजातील तथाकथित कमी बुद्धीच्या, कोत्या मनाच्या टीकाकार मंडळींनी ज्यांनी समाजाचे कुटाळ करण्याचे काम हाती घेतलेले असते अश्या लोकांकडून निकिताच्या वडिलांवर टीका होऊ लागली की हा आपल्या मुलीला का शिकवतोय..?
ही मुलगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते शिकून काय करायचे शेवटी लग्न करून धुणी भांडीच करायची आहेत ना, वय वाढत चालले आहे लग्न का करत नाही..? अशा अनेक प्रश्नांनी निकिता आणि तिच्या कुटुंबियांवर चौफेर हल्ला होत होता…
परंतु या हल्ल्याला भीक न घालता निकिताने आपल्या परिस्थितीची, गरीबीची जाण ठेवत आपले प्रयत्न चालू ठेवले आणि तिला यश आले. निकिता स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक या पदावर तिची नियुक्ती झाली…
जेव्हा खुशबू फर्निचर मॉलमध्ये तिचा सत्कार केला त्या सत्काराला उत्तर देताना तिने तिच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाचं व आपल्या आई वडिलांनी दिलेल्या साथी बद्दल कथन करत असताना अक्षरशः तिच्या डोळ्यातील अश्रू अनावर होऊन धारा वाहत होत्या…
हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचे डोळे ओले करणार होता. आणि अंगावर शहारे आणणारा होता. ही मुलगी कुठलीही संसाधने, ट्युशन, पोलीस भरती अँकॅडमी अशी साधने न वापरता फक्त आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपल्या गरीबीची जाण आणि आपल्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिने कष्ट करत आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करते…
आणि खरंच निकिता खरात सारख्या तरुणी या खऱ्या अर्थाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक दृष्ट्या मुलगी (लेक) म्हणूनच समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करते…
आणि जगाला सांगते कि जेव्हा आपले लक्ष्य आपल्या ध्येयाकडे असते त्या वेळेस तुमची परिस्थिती सुध्दा तुम्हाला थांबवू शकत नाही.
खरंच निकिता सारख्या ध्येयवेड्या मुली आजच्या तरुण पिढीला, विद्यार्थ्यांना लक्ष्य गाठण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page