बारामती तालुक्यातील विविध मागण्यांसाठी जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील विविध मागण्यांसाठी जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांनी बारामती तहसीलदार यांना आज निवेदन दिले आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम जिल्ह्यातील पट्ट्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अजून पावसाची परिस्थिती जैसे थेच आहे. त्यातच या परिसरात असलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे, नदी, नाले कोरडेच असल्याने शेतकऱ्यांना जास्त चिंता सतावत आहे. त्यातच पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी हे शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची होती तीही पिके जळून गेली आहेत. अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर बहुतांश भागात जनावरांचा चारा, पाणी यांची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात बारामती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी नुकताच या भागाचा दौरा केला त्यावेळीही त्यांनी या भागात पेरण्या झालेल्या नाहीत, काही झाल्या त्या उगवल्या नाहीत, चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याचे तसेच पिके जळून गेल्याची पाहणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनीही परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत व दुष्काळही जाहीर झाला पाहिजे हे मान्य केले.
अशा परिस्थितीमुळे शासनाने बारामती तालुक्याच्या या पश्चिम जिरायतील पट्ट्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, ज्या ठिकाणी नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी टँकर सुरू करावेत, पुरंदर उपसा सिंचन योजनेतून छोटे छोटे पाझर तलाव भरून द्यावेत, पुरंदर उपसा सिंचन योजना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास चालविण्यास द्यावी म्हणजे ऊस उत्पादकांना दिलासा मिळेल, बारामती तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा वरील मागण्या शासनाने त्वरित मान्य करून त्याच्यावर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन बारामती तालुक्यातील जोगवडी येथील छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे सुपा परगणा प्रमुख सुनील राजे भोसले, शांताराम भोसले, डॉ. सतीश राजे भोसले, हनुमंत भापकर आदींनी बारामती तहसीलदार यांना दिले आहे.