मोठ्या भावाच्या निधनानंतर लहान भाऊ बनला महाराष्ट्र पोलीस, मासाळवाडीच्या प्रफुल्ल गोरेची यशोगाथा
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मासाळवाडी या गावातील अतीशय सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या होलार समाजाच्या कुटूंबातील प्रफुल्ल गोरे या तरूणाची नुकतीच पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली. परिस्थितीने अतिशय गरीब असलेले गोरे कुटुंब उदरनिर्वाह करत असताना त्यांचे स्वप्न होते की आपल्या दोनही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी परंतु होमगार्ड असलेला प्रफुल्लचा मोठा भाऊ याचे मागील दीड वर्षांपूर्वी रक्षाबंधन दिवशी अचानक अटॅक येऊन मृत्यू झाला होता या घटनेमुळे गोरे कुटुंबीयांसह मासाळवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तोही होमगार्डची नोकरी करत असताना पोलीस भरतीसाठी परीक्षा देत होता. शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी याठिकाणी झाले असुन जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्याने सेल्फ स्टडी करीत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले.
प्रफुल्ल गोरे याच्या परीक्षेचा निकाल लागला आणि तो भरती झाल्याचे कळल्याने त्यांच्या घरच्यांना आनंद झाला. आज त्यांच्या घरच्यांचे पोलिस होण्याचे हे स्वप्न पूर्ण झाले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
या दोनही भावंडांना पहिल्यापासूनच शालेय जीवनात अभ्यासाची गोडी असताना मनात जिद्द होती की आपण काहीतरी करू शकतो.
आई-वडिलांच्या अथक परिश्रम व कष्टाला साथ देत त्याने हे यश मिळवल्याबद्दल प्रफुल्लचे पळशी, मासाळवाडी, तरडोली, लोणी भापकर ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
चौकट : थोरल्या मुलाचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, परंतु प्रफुल्लने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊन समाजापुढे एक आदर्श दाखवून दिला आहे. मिळेल त्या वेळेत वाद्यकाम करून पुस्तके, कपडे, बूट आदीसाठी पैसे जमा करून शिक्षण घेतले व आमच्या कष्टाचे त्याने चीज केले…(प्रफुल्लचे वडील) प्रकाश गोरे