कुणी पाणी देता का? पाणी? म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ…सुप्यात जनाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी शेतकरी संघर्ष कृषी समितीच्या वतीने पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
सुपे (ता. बारामती) येथे जनाई उपसा सिंचन योजनेसाठी शेतकरी संघर्ष कृषी समितीच्या वतीने 26 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
जनाई उपसा सिंचन योजनेद्वारे नियमीत व हक्काचे पाणी मिळावे अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी असून इतरही मागण्या आहेत.
शेतकरी संघर्ष कृती समितीचे पोपट खैरे, भानुदास बोरकर, प्रकाश काळखैरे, सचिन साळुंखे व ग्रामस्थ यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला परिसरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यावेळी विविध गावचे ग्रामस्थ, शेतकरी येत असून भजन, प्रवचन यासारखेही कार्यक्रम याठिकाणी होत आहेत. आज पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच होते.
या उपोषणाला आतापर्यंत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, शिवसेना नेते विजय शिवतारे, वासुदेव काळे, ॲड. प्रियदर्शनी कोकरे, बापूराव सोलनकर, चंद्रकांत वाघमोडे, विकास लवांडे, रंजन तावरे, तहसीलदार गणेश शिंदे आदीनी उपोषण स्थळी येऊन भेटी दिल्या व उपोषणकर्त्यांची चर्चाही केली.
या आंदोलनाला शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी दुपारी पहिल्याच दिवशी बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रात्री भेट दिली. यामध्ये उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली, काही अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चाही झाली. काही मागण्यांवर तोडगा निघाला नाही त्यामुळे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच होते. याप्रसंगी उपोषणाला सुपे परिसरातील गावांनी, नेत्यांनी आपला लेखी पाठिंबा यापूर्वीच दिला आहे.
उपोषणाला पाच दिवस पूर्ण होऊनही जनाई उपसा सिंचन योजनेचे किंवा जलसंपदा विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी हजर राहू शकले नाहीत, याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याप्रसंगी शेतकरी संघर्ष कृती समितीचे पोपट खैरे, भानुदास बोरकर, प्रकाश काळखैरे, सचिन साळुंखे, ज्ञानेश्वर कौले यांसह शेतकरी तसेच महिलाही मोठया संख्येने उपस्थित होत्या.
शिवकालीन सुपे परगना हा पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे परंतु या परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी असलेल्या जनाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी बारामतीतील स्थानिक खासदार, आमदारांना पाणी देता का? पाणी? या शेतकऱ्यांना कुणी पाणी देता का? म्हणण्याची वेळ आली आहे.