ड्रोनच्या भीतीने बारामती तालुक्याचा पश्चिम भाग भयभीत, रात्र काढावी लागतेय जागुन…अफवांनी नागरिक हैराण


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, मुढाळे, कानाडवाडी, मुर्टी, जोगवडी आदी गावांमध्ये व येथील वाड्या वस्त्यावर सध्या ड्रोनच्या दिसण्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अनेक गावात गेली चार पाच दिवसांपासून रात्रीच्या वेळी तीन ते चार ड्रोन घिरट्या घालतना दिसत आहेत. त्यानंतर वडगाव निंबाळकर, मुढाळे, कोऱ्हाळे आदी ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिस किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून खुलासा होणे गरजेचे आहे. यामुळे आता रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पूर्वी असलेली पोलीस मित्र ही संघटना पुन्हा खेडोपाडी निर्माण करावी लागण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. यामध्ये पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे आदींनी पुढाकार घ्यावा अशी ग्रामस्थ चर्चा करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
बारामती तालुक्यात मागील काही दिवसांत पाच ते सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असं इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्रीची उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. ड्रोन दिसल्यानंतर अनेकदा पोलिसांना माहिती दिली जाते. परंतु पोलिस पोहोचेपर्यंत ड्रोन गायब होत असल्याचे प्रकारही घडत आहेत.
केवळ बारामती तालुक्यातच नव्हे तर आसपासच्या अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र पोलिस अथवा प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबत अजून कसलाही खुलासा झालेला नाही. हे ड्रोन नेमके कोण फिरवत आहे याचा आजवर शोध लागलेला नाही. उलट ड्रोन फिरल्यानंतर लगेच चोरीच्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती वाढत आहे.
आजवर अनेक ठिकाणी ड्रोन फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत काहीच कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे ड्रोन फिरत असल्याच्या घटनांबाबत प्रशासनाकडून सध्या तरी बघ्याचीच भूमिका घेतली गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही ड्रोनच्या घिरट्यांचे गूढ उकलत नसल्याने पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सध्यातरी कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावोगावच्या ग्रामस्थांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती जोगवडीचे सुनीलराजे भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page