पावसाळ्यात लोणी भापकर मुख्य चौक होतोय तळे, ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
पावसाळ्यात लोणी भापकर मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप येत असून ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थ करू लागले आहेत.
लोणी भापकर (ता.बारामती) याठिकाणी गुरूवार दि. ८ जून रोजी पडलेल्या थोड्याशा पावसाने आजूबाजूचे पाणी वाहून मुख्य चौकात साठले होते. लोणी भापकर मधून बारामती, सुपा, मोरगाव, सोमेश्वर, कोऱ्हाळे आदी ठिकाणांकडे रस्ता जात असल्याने याठिकाणी नेहमीच दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे दुचाकी चालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात याठिकाणी नेहमी पाण्याचे मोठे तळे साचते, अशा दूषित पाण्यामुळे त्वचेच्या आजारासह आरोग्याच्या अन्य समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यापूर्वी याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
या समस्येकडे सरपंच तसेच स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. येथे घाणीचे साम्राज्य पसरत असुन पाणीही रस्त्यावर आल्यामुळे हा परिसर विद्रुप होत आहे. या परिसरात फिरताना आजी माजी सरपंच, सदस्य आणि कर्मचारी यांच्याही हे निदर्शनास येते. मात्र, जोपर्यंत कोणी तक्रारी करीत नाही, तोपर्यंत “चलता हे चलने दो’, अशी भावना असल्याकारणाने हा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकात नेहमीच लोकांची वर्दळ असते. याठिकाणी पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरू शकते. याठिकाणी पाणी साचून येथील रस्ता निसरडा होतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करून ग्रामपंचायत प्रशासनाने साचणाऱ्या या पाण्याचा बंदोबस्त करावा.
नवनाथ भापकर, संचालक – लोणी भापकर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी.