श्री नायकोबा देवाच्या यात्रेनिमित कुस्त्या उत्साहात, संतोष गावडे नायकोबा केसरी गदेचा मानकरी


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
  बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील अखंड धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी दुपारनंतर नायकोबा यात्रा कमिटी व भाविकांच्या वतीने भव्य अशा जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते.

Advertisement


यावर्षी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस माऊली गव्हाळे यांच्यातर्फे एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले होते. ही कुस्ती पैलवान तुषार डूबे व पैलवान विकास सुळ यांच्यात लावण्यात आली होती ती समान सोडवण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस 91 हजार रुपये असून ते उमाजी गुंडा टकले यांच्याकडून देण्यात आले होते. पैलवान संतोष पडळकर व पैलवान कुलदीप इंगळे यांच्यात ही कुस्ती लावण्यात आली होती व पै.पडळकर याने पोकळ घिस्सा या डावावर ही कुस्ती जिंकली. तिसरी कुस्ती कै. विठ्ठल तोलबा टकले व कै. नानासो तोलबा टकले यांचे स्मरणार्थ भाऊसाहेब विठ्ठल टकले व बापू नाना टकले यांच्यातर्फे 81 हजार रुपयांची होती. ही कुस्ती पै. अक्षय पिलाने व पै.शिवाजी टकले यांच्यात लावली होती त्यापैकी पै.टकले यांनी ही कुस्ती जिंकली.
तर नायकोबा केसरी चांदीची गदा याचे मानकरी पैलवान संतोष गावडे ठरला. पै. निखिल कदम विरुद्ध पै.संतोष गावडे यांच्यात ही कुस्ती लावण्यात आली होती. यामध्ये संतोष गावडे यांनी बाजी मारली. सोनबा काळे (पिंपरी सांडस) यांच्यातर्फे नायकोबा केसरी चांदीची गदा यावेळी देण्यात आली. उद्घाटन कुस्ती पैलवान राहुल टकले व पैलवान प्रथमेश नवगणे यांच्यात लावण्यात आली होती. यामध्ये पैलवान राहुल टकले विजयी ठरला.
या कुस्त्यांसाठी महादेव टकले, नाथा टकले, बाळू टकले, दत्तू टकले, राजेंद्र टकले, सोमा टेंगले, मारुती टकले, भालचंद्र भोसले यांनी आर्थिक मदत केली.
या कुस्त्यांचे व्यवस्थापन उमाजी टकले, भाऊसो टकले, आबा टकले, दत्तात्रय टकले, गुंडाप्पा टकले यांच्यासह यात्रा कमिटीने केले होते.
या कुस्त्यांसाठी पंच म्हणून पै. विकास जाधव, माणिक काळे, बापू टकले, खंडू टकले, नरहरी भोसले, मुरलीधर ठोंबरे यांनी काम पाहिले.
कुस्त्यांचे यंदाचे हे अकरावे वर्ष होते. या कुस्त्यांचे निवेदन अनिकेत कदम (फलटण) यांनी केले. यावेळी कुस्ती शौकीन व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून अनेक जिल्ह्यातून भाविक तसेच पहिलवान दरवर्षी मोठ्या प्रमाणात कुस्त्यांसाठी व कुस्त्या पाहण्यासाठी याठिकाणी येत असतात.
  श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, मासाळवाडी व विविध गावचे पुजारी, मानकरी, भाविक व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी बंदोबस्थासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page