लोणी भापकर येथे मंगळवारी श्री दत्तजयंती उत्सव, लोणी भापकरला भारतातील एकमेव दशभुजा दत्तमूर्ती
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी श्री दत्तजयंती सोहळा मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
दत्तजयंती दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी महापूजा करून दुपारी बारा वाजता वाजतगाजत श्रींना नैवद्य दाखवण्यात येईल. सायंकाळी चार नंतर भजनी मंडळाचा भजनसंध्या हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी श्रीदत्त जन्म असून पुष्पवृष्टी झाल्यानंतर आरती घेण्यात येईल, त्यानंतर खिरापत, सुंटवडा वाटण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी प्रक्षाळण पूजा करून महानैवेद्य दाखवण्यात येतो, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून श्रींची पालखी वाजतगाजत दत्त मंदिरापासून गावात श्री भैरवनाथ मंदिरात मिरवणूक काढून आणली जाते.
तिसऱ्या दिवशी सुपे येथील क्षीरसागर बंधू (तेली समाजाच्या) यांच्या वतीने लघुरुद्र तसेच भंडारा घातला जातो अशी माहिती दशभुजा दत्त संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गोलांडे यांनी दिली.
लोणी भापकर याठिकाणी एक हजार वर्षापूर्वीचे यादवकालीन मल्लिकार्जुन मंदिर तसेच दत्तानंद सरस्वती महाराज यांची संजीवन समाधी आहे. नृसिंह (नरसिंह) सरस्वतींच्या पादुकांची स्थापना स्वतः दत्तानंद सरस्वती महाराज यांनी याठिकाणी केली आहे. याच ठिकाणी भव्य असे दत्तमंदिर, वराहमुर्ती व पुरातन बारव देखील आहे.
लोणी भापकर येथील दत्तजयंतीस पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक याठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात.