दिव्यांग मतदार नोंदणीकरीता विशेष शिबाराचे आयोजन
बारामती : प्रतिनिधी
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालय बारामती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद आणि बाल कल्याण केंद्र मतिमंद व मुकबधिर मुलांची निवासी शाळा कसबा यांच्या संयुक्त विद्यमाने नायब तहसीलदार विलास करे यांच्या उपस्थितीत दिव्यांग मतदार नोंदणी व विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी निवासी शाळेच्या मुकबधिर विभागाच्या मुख्याध्यापिका मालती खैरे, मतिमंद विभागाच्या मुख्याध्यापिका राधिका मुळे, दिव्यांग कल्याण कक्ष पंचायत समितीचे मानसशास्त्रज्ञ संदीप शिंदे, डॉ. अनिल मोकाशी आदी उपस्थित होते.
या शिबीरामध्ये पात्र दिव्यांग मतदारांकडून सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन घेत त्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले. यात एकूण २१ दिव्यांग मतदारांचे मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ डिसेंबरपर्यत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
तालुक्यातील अधिकाधिक नवमतदारांनी आपले मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. पूर्वीच नाव नोंदविलेल्या मतदारांनी मतदार यादीत आपले नाव, छायाचित्रे, पत्ता आदी तपशील पडताळून पहावे, त्यामध्ये काही बदल असल्यास बदल करावे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ या संकेतस्थळाचा किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ ॲपचा वापर करावा.गणेश शिंदे, तहसीलदार