सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हनुमंत रामदास बांदल यांची बहुमताने निवड


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली आहे. सरपंचपदी थेट जनतेतून जालिंदर विष्णू भापकर हे बहुमताने निवडून आले आहेत. नवनियुक्त सरपंच जालिंदर भापकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे घेण्यात आलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हनुमंत बांदल यांना पाच मते मिळून ते विजयी झाले.
गुरूवार (दि.२३) रोजी सायंबाचीवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या उपसरपंच निवडणुकीसाठी हनुमंत बांदल, अमित जगताप, रामदास भापकर व शुभांगी जायपत्रे यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते. नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या वेळेत अमित जगताप व रामदास भापकर यांनी उमेदवारी मागे घेतली.
अर्ज माघारी घेतल्यानंतर उपसरपंचपदासाठी हनुमंत बांदल व शुभांगी जायपत्रे यांचे अर्ज शिल्लक राहिले. सभेत प्रथम चर्चा होऊन हात वर करून मतदान घ्यावे अशी सूचना मांडण्यात आली परंतु रामदास भापकर व शुभांगी जायपत्रे यांनी गुप्त मतदान प्रक्रिया राबवावी अशी सूचना मांडली यावर अध्यासी अधिकारी यांनी गुप्त मतदान घेणेबाबत निर्णय घेतला. यामध्ये प्रथम हनुमंत बांदल यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले होते त्यानुसार त्यांनी पतंग चिन्ह घेतले तर शुभांगी जायपत्रे यांनी कपबशी हे चिन्ह घेतले त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये हनुमंत बांदल यांना ५ मते तर शुभांगी जायपत्रे यांना ३ मते मिळाली.
त्यानुसार हनुमंत बांदल हे उपसरपंचपदावर बहुमताने निवडून आल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी कामकाज पाहिले.
यावेळी सदस्य छबुबाई मदने, सविता भगत, हनुमंत बांदल, दिपाली भापकर, अमित जगताप, शुभांगी जायपत्रे, रामदास भापकर तसेच डी.पी.जगताप, प्रमोद जगताप, पोलीस पाटील गोविंद जगताप, अमित भापकर यांसह वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय समाधान लव्हटे, पीएसआय पांडुरंग कन्हेरे व इतर पोलिस कर्मचारी, ग्रामसेवक युवराज गावडे, तलाठी गजानन चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करू असे मत यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page