श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. या प्रकरणाचे कारखान्याच्या सभासदांमध्ये जोरदार पडसाद उमटत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर थातुर मातुर कारवाई करून हे प्रकरण दाबले गेले पाहिजे, असाच प्रयत्न काही संचालक व अधिकारी करीत आहेत. हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचाराचा पैसा हा सभासदांच्या खिशातून जात आहे.
या सर्व प्रकाराविरोधात एखादा संचालक कारखान्यातील सभासद व गोरगरीब कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन आवाज उठवत असेल तर अशा संचालकांवर कारखान्यातील काही वरिष्ठ पदाधिकारी व अधिकारी त्यांचा आवाज दाबण्यासाठी व त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सगळा प्रकार पाहता ज्यांच्या त्रासाला कंटाळून भ्रष्ट व लबाड असे काही अधिकारी आपले राजीनामे देण्याची भीती दाखवत आहेत यातील काही अधिकाऱ्यांच्या खात्यात खूप मोठा सावळा गोंधळ चालू आहे. तरी या संचालकाच्या त्रासाला कंटाळून काही अधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत असा आरोप या संचालकावर केला जात आहे.
यामधील अनेक अधिकाऱ्यांच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम हे संचालक सभासद व कारखाना हितासाठी करीत असेल तर अशा संचालकाला नाहक बदनाम करणे कितपत योग्य आहे. कारखान्यामधील अनेक अशा गोष्टी आहेत त्या चव्हाट्यावर आल्या तर कारखाना सभासदांमध्ये असंतोषाची लाट पसरू शकते. श्री सोमेश्वराला स्मरून हा सर्व भ्रष्टाचार किंवा कारखान्याचा गैर आर्थिक कारभार सुज्ञ सभासदांपुढे आलाच पाहिजे, अशी सर्व सभासद बंधूंची मनापासून इच्छा आहे.